तिलक वर्माने गुजरातविरुद्ध शानदार शतक मारलं. तिलकच्या या खेळीमुळे मुंबई इंडियन्सच्या पराभवाची मालिका संपुष्टात आली. तिलकने 45 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. त्याने पहिल्या 22 चेंडूत 19 धावा केल्या आणि नंतरच्या 23 चेंडूत 82 धावा केल्या. शेवटच्या चेंडूत त्याला शतक पूर्ण करण्यासाठी तीन धावा हव्या होत्या आणि त्याने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला. त्याने 45 चेंडूत शतक पूर्ण केलं. मुंबईसाठी जलद शतक मारण्याच्या यादीत त्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याची बरोबरी केली. मुंबईसाठी शतक झळकावणारा तो दहावा खेळाडू ठरला. त्याच्याआधी कोणत्या 9 खेळाडूंनी मुंबईसाठी शतक मारलं हे आपण जाणून घेऊयात.
1. सनथ जयसूर्या –
मुंबईसाठी शतक झळकावणारा पहिला खेळाडू होता सनथ जयसूर्या. त्याने 2008 मध्ये चेन्नईविरुद्ध शतक खेचलं. त्याने 48 चेंडूत नाबाद 114 धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने शतक 45 चेंडूत पूर्ण केलं. मुंबईसाठी सर्वात जलद शतक मारण्याच्या यादीत तो तिलक वर्मासोबत प्रथम क्रमांकावर आहे.
2. सचिन तेंडुलकर –
सचिन तेंडुलकर यांनी 2011 मध्ये कोची कोची टस्कर्स केरळविरुद्ध शतक मारलं. सचिनने इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर धाव घेऊन शतक पूर्ण केलं. सचिन आयपीएलमध्ये शतक मारणारा चौथा सर्वात वयस्कर खेळाडू आहे, पण दुर्दैवाने मुंबईने हा सामना गमावला.
3. रोहित शर्मा –
मुंबईसाठी शतक मारणारा रोहित शर्मा चौथा खेळाडू ठरला. त्याने 2012 मध्ये कोलकाताविरुद्ध 60 चेंडूत नाबाद 109 धावांची खेळी केली होती.
4. लेंडल सिमन्स –
लेंडल सिमन्स 2014 मध्ये जलज सक्सेना दुखापतग्रस्त झाल्यावर त्याचा बदली खेळाडू म्हणून आला. त्या हंगामात सिमन्सने कहरच केला, त्याने 8 सामन्यात ३९४ धावा केल्या. त्यात पंजाबविरुद्ध एका शतकीय खेळीचादेखील समावेश आहे. त्याने पंजाबविरुद्ध ६१ चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी केली.
5. सूर्यकुमार यादव –
सूर्यकुमार यादवने 2023 मध्ये गुजरात विरुद्ध 49 चेंडूत 103 धावांची खेळी केली आणि मुंबईसाठी शतक खेचणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आपलं नाव कोरलं.
6. कॅमेरॉन ग्रीन –
2023 च्याच हंगामात सूर्यकुमार यादवसोबत आणखी एका मुंबईच्या खेळाडूने शतक मारलं होता. कॅमेरॉन ग्रीनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 47 चेंडूत 100 धावांची खेळी केली होती. मुंबईसाठी हा सामना अत्यंत गरजेचा होता आणि ग्रीनने या सामन्यात शतक झळकावले होते.
7. रोहित शर्मा –
रोहित शर्मा पहिला खेळाडू होता आहे ज्याने मुंबई इंडियन्ससाठी दोन शतकं झळकावली आहेत. त्याने 2012 मध्ये कोलकाता विरुद्ध तर 2024 मध्ये चेन्नई विरुद्ध शतकीय खेळी केली. रोहितने 63 चेंडूत 105 धावांची खेळी केली. मात्र, मुंबईने हा सामना गमावला.
8. सूर्यकुमार यादव –
सूर्यकुमार यादव दुसरा खेळाडू ठरला ज्याने मुंबईसाठी दोन शतकं झळकावली. त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याचे दुसरे शतक झळकावले. त्याने 51 चेंडूत 102 धावांची खेळी केली होती. मुंबई 3 बाद 31 धावांवर होती, तिथून सूर्यकुमारने उत्कृष्ट खेळी करत 174 धावांचे लक्ष्य पूर्ण केले.
9. क्विंटन डी कॉक –
क्विंटन डी कॉक मुंबईसाठी शतक मारणारा नववा खेळाडू ठरला त्याने पंजाबविरुद्ध 60 चेंडूत 112 धावांची खेळी केली. त्याने मुंबईसाठी 5 वर्षांनी पुनरागमन केले आणि पहिल्याच सामन्यात शतकीय खेळी केली. दुर्दैवाने मुंबईने तो सामना गमावला.
10. तिलक वर्मा –
तिलक वर्मा मुंबईसाठी शतक झळकावणारा दहावा खेळाडू ठरला. त्याने गुजरातविरुद्ध 45 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. मुंबईसाठी शतक मारणारा तो सगळ्यात युवा खेळाडू ठरला. त्याने हा विक्रम 23 वर्ष 163 दिवसांचा असताना पूर्ण केला. त्याने कॅमेरॉन ग्रीनचा 23 वर्ष 356 दिवसांचा विक्रम मोडला.